मार्केटयार्डात बेशिस्त वाहनांमुळे वाहतूक कोंडी   

पुणे : मार्केटयार्ड आणि वाहतूक कोंडी हे समीकरणच आहे. आता त्यात बेशिस्तपणे वाहने लावली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे शहर व उपनगरातून खरेदीसाठी मार्केटयार्ड आलेल्या ग्राहकांसह शेतकर्‍यांना त्याचा फटका सहन करावा लागला. 
 
बाजारात येताना ग्राहकांना व शेतकर्‍यांना भेडसावणारा मुख्य प्रश्न म्हणजे येथील वाहतूक कोडी आणि वाहन पार्किग. या दोन्ही प्रश्नांमुळे नागरिक त्रस्त होत आहेत. त्यात बाजार घटकातील मुख्य प्रवेशद्वारावर अधिकार्‍यांनाच पार्किगसाठी राखीव जागा असताना याठिकाणी कोणीही वाहन पार्क करत असल्यामुळे नियोजनाचा खेळ खंडोबा झाला आहे. त्यामुळे अधिकार्‍यांनाही जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करावी लागत आहेत. मार्केटयार्ड परिसरात रविवारी पार्किंगच्या बेशिस्तीमुळे अधिकार्‍यांसह नागरिक गैरसोयीचा सामना करावा लागला. 
 
मार्केटयार्ड परिसरात पार्किंग व वाहतूक कोडी सोडवण्यासाठी पार्किग शुल्क वसुलीसाठी ठेकेदार व सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे. तरी ही शिवनेरी पथावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी आणि बेशिस्त पार्किंगच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केली. मात्र तरीही पार्कीग समस्या व बाजारीतील चोरीच्या घटनेला आळा बसलेला नाही. यामुळे बाजार समिती संचालक मंडळ शेतकरी व व्यापारी समस्या सोडवण्यास अपयशी ठरत आहेत. मुख्य प्रवेशद्वाराजवळच पार्कीगचा विळखा असल्याने अधिकार्‍यांना ही गाडी लावण्यास जागा मिळत नसल्याचे चित्र आहे. यामुळे राखीव जागा असलेल्या पार्किगमध्येच नागरिकांनी बेशिस्त गाडया लावल्याने वाहतूक कोडीला चालना मिळत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि बेशिस्त वाहन चालवणार्‍यांवर ठोस कारवाई करण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची मागणी बाजार घटक करत आहेत. 

कठोर कारवाई होणार 

बाजाराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच पार्कीगसाठी मोठी जागा उपलब्ध आहे. तरीही काही नागरिक राखीव जागेवर गाडी लावून जातात. यावर कठोर कारवाई करण्यासाठी सुरक्षारक्षकांची नेमणूक केली आहे. बेशिस्त गाडया लावणार्‍यांवर कारवाई केली जाईल.
 
- डॉ. राजाराम धोंडकर, सचिव,कृषि उत्पन्न बाजार समिती पुणे.
 

Related Articles